मानधन तत्वावर व्हॉलीबॉल प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन.
पुणे ७: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने विभागीय क्रीडा संकुल येथे मुले व मुलींसाठी खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रासाठी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर प्रशिक्षक नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले.
केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने व राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून अर्ज करणारा उमेदवार ४५ वर्ष वयोगटाआतील असावा. यामध्ये अतिउच्च गुणवत्ता असल्यास समितीच्या मान्यतेने ५० वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग किंवा पदक प्राप्त प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी प्रशिक्षणाचा अनुभव असावा. एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत पातळीचे अभ्यासक्रम किंवा बीपीएड- एमपीएडसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त प्रशिक्षणाचा अनुभव असावा. राज्यस्तर खेळाडू बीपीएड- एमपीएडसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त कमीतकमी ५ वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असावा.
अर्हताप्राप्त उमेदवारांनी आपले अर्ज १५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे सर्व्हे नं. १९१, ग्यानबा मोझे हायस्कुल समोर, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे येथे समक्ष सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी ए. जी. सोलणकर (९८२२३५६१९७) व क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (९५५२९३१११९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.