संरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक.

संरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक.

दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना.

मुंबई : भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.

आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकिर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेल्या अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते, त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसत होते.

दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *