इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मीतीत जगात आघाडी घ्यावी- पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे.

City EV Accelerator function

इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मीतीत जगात आघाडी घ्यावी- पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे.City EV Accelerator function

पुणे : जगाला आज हरित ऊर्जेची गरज असून प्रदूषण रोखणे आणि त्या माध्यमातून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी  इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, हायड्रोजन सेल आदी पर्यावरणपूरक बाबींच्या उत्पादनामध्ये देशातच नव्हे तर जगात आघाडी घेण्यासाठी या क्षेत्रातील उद्योगांनी पुढे यावे असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

पुणे महानगरपालिका आणि ‘रॉकी माऊंटन इन्स्टिट्यूट’ (आरएमआय) तसेच आरएमआय इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुणे सिटी इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सेलरेटर’ कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, आरएमआय इंडियाच्या वरिष्ठ प्राध्यापक अक्षिमा घाटे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, हवामान बदल हे संपूर्ण जगापुढील आव्हान आहे. गेल्या 11 महिन्यात देशाच्या पश्चिम किनारपट्टीला 3 मोठ्या चक्रीवादळांना सामोरे गेलो आहोत. त्यामुळे आपल्याला हवामान बदलांना सक्षमपणे सामोरे जात पर्यावरणाचे जतन करायचे आहे. त्यासाठी आपल्याला ऊर्जेच्या नैसर्गिक पर्यायांचा वापर आणि परिवहनक्षेत्रात कार्बनचे उत्सर्जन कमी करायचे आहे. हे आव्हान असले तरी यामध्ये खूप संधीदेखील दिसत असून त्याचा लाभ घ्यायचा आहे. महाराष्ट्र शासनाने या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट असे इलेक्ट्रिक वाहन धोरण (ई.व्ही. पॉलीसी) बनवले आहे.

इलेक्ट्रिक वाहने निर्मिती, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. राज्य शासनाचे ई.व्ही. धोरण  देशातील एक उत्कृष्ट आणि आकर्षक धोरण असल्याचे उद्गार नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी काढले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, चार्जिंग स्टेशन उभारणी क्षेत्रातील उद्योग, संस्थांना पाठबळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून धोरणात आवश्यक तसे बदल करण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला यासंदर्भातील कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत. या क्षेत्रातील उद्योगांच्या मागण्यांबाबत सकारात्मकपणे काम केले जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

आशिष कुमार सिंह म्हणाले, शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. पुणे महानगर पालिकेच्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागांची निश्चिती करावी. ‘फेम’ पॉलिसी अंतर्गत केंद्र शासनाकडून इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगाला अनुदान दिले जाते त्याचा लाभ ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करावा. या क्षेत्रातील उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण डॅशबोर्ड तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

विक्रम कुमार म्हणाले, पुणे हे सर्वाधिक दुचाकींची संख्या असलेले शहर आहे. पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेला पुणे महानगर परिवहन उपक्रम बळकट करायचा आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक बसेसची संख्या सध्याच्या 150 वरून येत्या मार्चपर्यंत 650 वर नेण्यात येणार आहे. त्यातून खासगी कंपन्यांनाही इलेक्ट्रिक वाहने भाड्याने देण्यात येणार आहेत. ईव्ही उद्योगाला चालना देण्यासाठी महानगरपालिकेने खास ईव्ही कक्ष स्थापन केला आहे. चार्जिंग स्टेशन उभी करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मिळकर करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी निर्मिती, चार्जिंग स्टेशन या क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी या क्षेत्रापुढील समस्या उपस्थितांसमोर मांडल्या.

कार्यक्रमादरम्यान एआरएआय आणि पुणे महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार झाला. यानुसार एआरएआयकडून पुणे महानगरपालिकेला 10 ईव्ही चार्जर्स मोफत देण्यात येणार आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *