आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा.
स्पर्धेच्या नियोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
– क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया.
पुणे : एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन द्वारा आयोजित आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियासह आशिया खंडातील १२ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिल्या.
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आज क्रीडा आयुक्त श्री.बकोरिया यांनी आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धेच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला.
स्पर्धेच्या पूर्व तयारी कामकाजाचा सविस्तर आढावा घेवून श्री.बकोरिया म्हणाले, पुणे, नवी मुंबई व मुंबई या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. फुटबॉल क्रीडा प्रकारातील आशिया खंडातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे.
ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील भारत, चीन,थायलंड, चायनीझ तैपेई, फिलीपीन्स, इराण, इंडोनेशिया, जपान, कोरिया, व्हिएतनाम, म्यानमार या एकूण १२ देशांचा सहभाग आहे. एकूण २७ सामने होणार आहेत.
२०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या फिफाद्वारा आयोजित होणाऱ्या जागतिक महिला करंडक फुटबॉल स्पर्धांसाठी या महिला आशियाई स्पर्धेतून प्रथम ५ संघांची निवड करण्यात येणार आहे.
आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धेच्या नियोजनात सर्व विभागांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व कामे योग्य नियोजन करुन समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना श्री.बकोरिया यांनी दिल्या.
बैठकीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, कोविड चाचण्या घेण्याबाबत सुविधा, रस्ते कामे व सुशोभिकरण, पाणी व्यवस्था, अग्नीशामक यंत्रणा, स्पर्धा प्रसिदधी, विद्युत व्यवस्था, नोडल अधिकारी नियुक्ती आदींसह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीनंतर सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या ठिकाणाची पाहणी केली