राज्यात 21 तारखेला झालेल्या तीन महापालिकांच्या प्रत्येकी एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर.
राज्यात 21 तारखेला झालेल्या तीन महापालिकांच्या प्रत्येकी एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 – क च्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी 517 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी यांचा पराभव केला.
धुळे महानगर पालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आरती अरुण पवार यांनी महाविकास आघाडीच्या अनिता संजय देवरे यांचा पराभव केला.
नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 अ पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या मुस्काना सय्यद वाजिद यांनी ए आय एम आय एम पक्षाच्या उमेदवार रेशमा बेग यांचा पराभव करून विजय प्राप्त केला.
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी नगर पंचायत पोटनिवडणुकीत भाजपने दोन्ही जागेवर विजय मिळविला आहे. यापूर्वी या जागा शिवसेनेकडे होत्या.
प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील यापूर्वीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी वेळेवर जातप्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना नगरसेवकपद गमवावे लागले होते.
परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचे निकाल काल जाहीर करण्यात आला. सोनखेड ,नरहापुर, रुंज,देऊळगाव दुधाटे या चार ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते.