देशातील 15-18 वयोगटातील युवा वर्गाला मिळणार लस. शिक्षण प्रक्रियेला मदत.
आघाडीवरील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिंकाना खबरदारी म्हणून लसीची मात्रा
आरोग्य आणि आघाडीच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आत्मविश्वासाला बळकटी मिळेल
घाबरून जाऊ नका, मात्र, ओमायक्रॉन बाबत सावधगिरी बाळगण्याचा जनतेला इशारा
देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधेच्या सद्यस्थितीची देशाला दिली माहिती
ज्या प्रकारे विषाणूमध्ये झपाट्याने अनियमित परिवर्तन होत आहे, या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपली क्षमता आणि आत्मविश्वास देखील आपल्या नवोन्मेषी भावनेने कैक पटीने वाढत आहे
दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. 3 जानेवारी 2022 रोजी सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. या
निर्णयामुळे शाळांमधील शिक्षणप्रक्रिया सामान्य होण्याची आणि शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चिंता कमी होण्याची अपेक्षा आहे.
त्यांनी आरोग्य आणि आघाडीवरील क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 10 जानेवारी 2022 पासून खबरदारी म्हणून लसीची मात्रा देण्याची देखील घोषणा केली. कोविड रुग्णांच्या सेवेसाठी आघाडीवरील कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी व्यतित करत असलेल्या वेळेचे प्रमाण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये लसीच्या या मात्रेला बूस्टर मात्रा असे न म्हणता खबरदारीची मात्रा असे म्हटले जात आहे. खबरदारीच्या मात्रेमुळे आरोग्य आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. त्याचप्रकारे सहव्याधी असलेल्या 60 वर्षांवरील नागरिकांसाठी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने 10 जानेवारी 2022 पासून खबरदारीच्या मात्रेचा पर्याय उपलब्ध असेल अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.
भारतातील ओमायक्रॉन संसर्गाविषयी बोलताना ते म्हणाले की नागरिकांनी यामुळे घाबरून जाऊ नये आणि मास्क वापरणे आणि वारंवार हात धूत राहण्याच्या उपाययोजनांचा अवलंब सुरू ठेवला पाहिजे. या महामारीचा सामना करताना जागतिक पातळीवरील अनुभव असे सांगतो की कोरोना विरोधातील लढाईमध्ये सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन हीच सर्वात मोठी शस्त्रे सिद्ध झाली आहेत. दुसरे शस्त्र आहे लसीकरण, असे त्यांनी सांगितले.