राज्यात एका दिवसात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ३१ रुग्णांची नोंद.
राज्यात आज ओमायक्रॉन संसर्गाचे ३१ रुग्ण आढळले आहेत. यातले २७ मुंबईत, ठाण्यात दोन तर पुणे ग्रामीण आणि अकोल्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 141 झाली आहे. यातल्या एकसष्ट जणांची आर टी पी सी आर चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे.
मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी चार रुग्ण गुजरात, तीन कर्नाटक, दोन रुग्ण केरळ आणि दिल्ली तर प्रत्येकी एक रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद इथले आहेत.
दोन रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज १ हजार ६४८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण ९ हजार ८१३ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. राज्यात आज कोरोनामुळं १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.