१५-१८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणासाठी १ जानेवारीपासून नोंदणी सुरू होणार.
दिल्ली :१५ ते १८ या वयोगटातल्या मुलांसाठी, तसंच आरोग्य कर्मचारी, आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे आणि ६० वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासंबंधीची नियमावली केंद्र सरकारनं आज जारी केली आहे.
या नियमावलीनुसार १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणासाठी पात्र लाभार्थी कोविन अॅपवर स्वतःचं नवं खातं तयार करून, किंवा संबंधितांच्या जुन्या खात्यावरून ऑनलाईन पद्धतीनं, तसंच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकतील.
या सोबतच १५ ते १८ वयोगटाले आणि वर्धक मात्रेसाठी पात्र असलेले नागरिक कोविन वर ऑनलाईन पद्धतीनं किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रात जाऊन लस घेण्यासाठीच्या तारखेची नोंदणी करू शकणार आहेत. १५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. कोविन अॅपचे प्रमुख डॉ.आर.एस. शर्मा यांनी ही माहिती दिली. प्रत्येक मुलाकडे आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र नसण्याची शक्यता आहे, त्यामुळे या नोंदणीसाठी ओळखपत्र म्हणून, ‘विद्यार्थी’ अशी नवी वर्गवारी कोविनवर टाकली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
१५ ते १८ वयोगटासाठी येत्या ३ जानेवारी २०२२ पासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. मात्र या लाभार्थ्यांना केवळ कोव्हॅक्सिन याच लसीचा पर्याय उपलब्ध असेल. त्यांना इतर कोणतीही दुसरी लस घेता येणार नाही.
येत्या १० जानेवारी २०२२ पासून प्रत्यक्षात ‘वर्धक’ मात्रा द्यायला सुरुवात होईल. यासाठी लसीची दुसरी मात्रा घेतल्यावर ९ महिने पूर्ण झालेले आरोग्य कर्मचारी, आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानुसार ६० वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्या नागरिक पात्र असतील. अशा सर्वांसाठी पात्रतेचे दिवस, त्यांनी याआधी घेतलेल्या लसींसाठी कोविन अॅपवर नोंदल्या गेलेल्या तारखेपासून मोजले जाणार आहेत. वर्धक मात्रेसाठी पात्र ठरल्यावर अशा व्यक्तींना कोविन अॅपवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवला जाणार आहे. वर्धक मात्रा घेतल्याची नोंद लसीकरण प्रमाणपत्रावर करून दिली जाणार असल्याचंही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.