नसरापूर येथे मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेचा उपक्रम.
पुणे: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि भोर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत, दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजने अंतर्गत भोर, वेल्हा, पुरंदर तालुक्यातील युवक- युवतींसाठी मंगळवार 28 डिसेंबर रोजी विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्ताने नसरापूर (ता. भोर) येथील कुंभारकर लॉन्स येथे सकाळी 10 ते सायं.5 या वेळेत हा मेळावा होणार आहे.
भोर, पुरंदर, वेल्हा तालुका, आणि परिसरातील 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी पदविका, आणि अभियांत्रिकी पदवी तसेच इतर पदवीधर सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींकरीता; रांजणगाव, भोसरी, हडपसर, चाकण, पिंपरी चिंचवड, जेजुरी, वेळू, शिरवळ या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील (एमआयडीसी) नामवंत कंपन्यांमध्ये रोजगार मिळविण्याची संधी; या मेळाव्यात उपलब्ध होणार आहे. याशिवाय रोजगाराच्या विविध क्षेत्रातील संधींबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले जाणार आहे,
यावेळी मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागद पत्रांच्या, आधारकार्डच्या मूळ व छायाप्रती, पारपत्र आकाराची 2 छायाचित्रे, कोविड प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सोबत आणावीत. मेळाव्यात कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. जास्तीत जास्त युवक- युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोर पंचायत समितीचा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे