विद्यापीठात ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क’ अभ्यासक्रमाला सुरुवात.
‘नॅशनल मरीटाईम फाउंडेशन’ सोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या ‘नॅशनल मरीटाईम फाउंडेशन’ सोबत सामंजस्य करार करत ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क’ हा नवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला असून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियाही सुरू झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने दिल्लीस्थित ‘नॅशनल मरीटाईम फाउंडेशन’ सोबत सोमवारी २७ डिसेंबर रोजी सामंजस्य करार केला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे, नौसेनेतील उच्च पदस्थ निवृत्त अधिकारी व ‘नॅशनल मरीटाईम फाउंडेशन’ चे, महासंचालक प्रदीप चौहानआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यापूर्वी विद्यापीठाने संरक्षण मंत्रालय, भू सेना आणि वायुसेना यांच्या तीन स्वतंत्र ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ मिळवल्या आहेत. या सामंजस्य कराराने आता आम्ही नौदलासोबतही जोडले गेले असून भविष्यात या विषयात अधिक अभ्यासक्रम देण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
– डॉ.नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
यावेळी प्रदीप चौहान यांचे ‘युद्धनौकांचा ऐतिहासिक आणि समकालीन विकास: प्रकार, प्रकल्प आणि मूळ वैशिष्ट्ये’ या विषयावर व्याख्यान झाले. चौहान यांनी युरोपियन युद्धनौकांपासून ते आतापर्यंतच्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित भारतीय युद्धनौकांबाबतचा इतिहास विद्यार्थ्यांना तसेच सामान्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितला. युद्धनौका या काळाप्रमाणे कशा बदलत गेल्या, त्या बदलण्यामागे कारणे काय होती, त्यांची रचना ठरवण्यामागे कोणता हेतू आहे, त्यांचे प्रकार कोणते याबाबत त्यांनी सादरीकरण (प्रेझेंटेशन) केले. त्याचबरोबर विद्यार्थी व उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली.
यावेळी डॉ.विजय खरे म्हणाले, या अभ्याक्रमातून सागरी संरक्षण, सागरी अधिवास, पाण्याखालील ध्वनी, समुद्रातील खाणी, सागरी अर्थकारण, पाण्याखालील वाहतूक असा सर्वांगीण सागरी अभ्यास करणे शक्य होईल. यासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.