मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ, सलग तिसऱ्यांदा आदल्या दिवशीच्या जवळपास दुप्पट रुग्णांची नोंद.
मुंबई : मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येनं वाढ होते आहे. आज मुंबईत २ हजार ५१० नवे रुग्ण आढळून आले तर २५१ रुग्ण बरे झाले. १ डिसेंबरला मुंबईत १०९ आणि २१ डिसेंबरला २९९ नवे रुग्ण आढळून आले होते. आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या नव्या रुग्णांची आदल्या दिवशीच्या जवळपास दुप्पट झाली.
२७ डिसेंबरला मुंबईत ७८१, २८ डिसेंबरला १३७७ आणि आज २ हजार ५१० रुग्ण आढळले. याकालावधीत बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण मात्र जवळपास सारखंच आहे. २१ डिसेंबरनंतर मुंबईत ८ हजार २८६ नवे रुग्ण आढळून आले आणि या कालावधी २ हजार ४५२ रुग्ण बरे झाले. यामुळं डिसेंबरच्या सुरुवातीला १ टक्क्यांपेक्षा कमी असलेला मुंबईतला पॉझिटिव्हीटी दर ५ टक्क्यांच्या वर गेला आहे. महिन्याच्या सुरुवातीला मुंबई सुमारे १ हजार ९०० रुग्ण उपचाराधीन होते. आता ही संख्या ८ हजारांच्या वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत फार वाढ झालेली नाही.
गेल्या आठवडातभरात मुंबईत कोरोनामुळं ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गांभीर्याने घेत मुंबई महापालिकेने ५ ठिकाणी जंबो कोविड सेंटर कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडून भाडे तत्वावर व्यवस्थापन सेवा घेण्यात येणार आहे. पालिका त्याकरिता वैद्यकीय संस्थेला तब्बल १०५ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला विना चर्चा आणि बिनविरोध मंजुरी देण्यात आली.