उच्च शैक्षणिक संस्थांनी भारतीय नवोन्मेश आणि स्टार्ट अप्स परीसंस्थेसाठी सक्षमीकरणाची भूमिका बजावावी.

उच्च शैक्षणिक संस्थांनी भारतीय नवोन्मेश आणि स्टार्ट अप्स परीसंस्थेसाठी सक्षमीकरणाची भूमिका बजावावी.

नवोन्मेशामधे संस्थांची कामगिरी दर्शवणारी अटल क्रमवारी 2021 (एआरआयआयए) केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष सरकार यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे केली जाहीर.

विविध श्रेणीमध्ये महाराष्ट्राची मोहोर, सरकारी महाविद्यालये/ संस्था श्रेणीत अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अव्वल स्थानी, दुसऱ्या एका श्रेणीत आयआयटी बॉम्बे दुसऱ्या क्रमांकाची मानकरी तर वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल यांचाही सर्वोच्च क्रमवारीत समावेश.

नवी दिल्‍ली : नवोन्मेशामधल्या कामगिरीसाठी संस्थांची  क्रमवारी ठरवणाऱ्या अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्युटशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट (एआरआयआयए) 2021,  केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष सरकार यांनी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे जाहीर केली. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे, तंत्र शिक्षण अतिरिक्त सचिव राकेश रंजन, मंत्रालयाच्या नवोन्मेश विभागाचे मुख्य नवोन्मेश अधिकारी डॉ अभय जेरे आणि शिक्षण नवोन्मेश संचालक डॉ मोहित गंभीर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

एआरआयआयए क्रमवारी, भारतीय संस्थाना आपल्या विचारांना नवी दिशा देण्यासाठी आणि आपल्या परिसरात उच्च दर्जाचे संशोधन, नवोन्मेश आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देणारे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी निश्चितच स्फूर्तीदायी असा विश्वास डॉ सरकार यांनी यावेळी व्यक्त केला. 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रीलीयन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने नवोन्मेशाला प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला. नाविन्यता आणि संशोधन यांचे परिमाणात मोजमाप न करता संस्थांनी त्याच्या गुणवत्तेवर लक्ष  केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले.

नव संशोधन आणि स्टार्ट अप्स यामधल्या  भारताच्या  सातत्यपूर्ण वृद्धीचा उल्लेख करत जगातल्या सर्वात  मोठ्या उच्च शैक्षणिक व्यवस्थेपैकी भारत एक असल्याचे ते म्हणाले. भारतीय नवोन्मेश आणि स्टार्ट अप्स परीसंस्थेसाठी सक्षमीकरण करणाऱ्याची भूमिका बजावण्यासाठी उच्च शिक्षण संस्थाना व्यापक संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे केवळ आर्थिक स्तरावरच नव्हे तर सामाजिक आणि पर्यावरण विषयक आघाडीवरही नक्कीच क्रांती घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या प्रयत्नांची तसेच एआरआयआयएच्या नियोजन आणि अंमलबजावणी आणि याच्या दोन यशस्वी  आवृत्त्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेश विभागाची डॉ सरकार यांनी प्रशंसा केली. एआरआयआयएची चौथी आवृत्ती त्यांनी जारी केली आणि उच्च शिक्षण संस्थांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

एआरआयआयएद्वारे आरेखित करण्यात आलेल्या नवोन्मेश आणि उद्योजकता यामधल्या या स्वदेशी आवृत्तीच्या क्रमवारीमुळे, आपल्या उच्च शिक्षण संस्थाना त्यांच्या प्रयत्नांचे दर्शन तर घडवता येईलच,त्याच बरोबर संस्थात्मक स्तरावर उद्दिष्टे ठरवण्यासाठी आणि जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान आणखी पुढे आणण्यासाठी मार्गदर्शनही होईल असे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे प्रा अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

भारतातल्या सर्व शैक्षणिक संस्थाना क्रमवारी देण्यासाठी  एआरआयआयए हा शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे. विद्यार्थी आणि विद्याशाखा प्राध्यापक यामध्ये  नवोन्मेश, स्टार्ट अप्स आणि उद्योजकता विकास यांच्याशी संबंधित निकषांवर ही क्रमवारी ठरवली जाते.

एआरआयआयए 2021 क्रमवारी विविध श्रेणींमध्ये जाहीर करण्यात आली. आयआयटी, एनआयटी यासारख्या केंद्रीय निधी प्राप्त तंत्र संस्था, राज्य विद्यापीठे, राज्य स्वायत्त तंत्र महाविद्यालये,बिगर तंत्र सरकारी आणि खाजगी विद्यापीठे आणि संस्था अशा श्रेणीत ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. यावर्षी सहभागी संस्थांची संख्या  दुप्पट होत 1438 झाली, तर पहिल्या क्रमवारीच्या तुलनेत चौपट झाली.

आज जाहीर झालेल्या क्रमवारीत,  केंद्रीय विद्यापीठे /राष्ट्रीय महत्वाच्या संस्था (तंत्र) या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातल्या आयआयटी मुंबईने दुसरे स्थान पटकावले आहे.

राज्य विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठे (सरकारी आणि सरकार अनुदानित) (तंत्र) या श्रेणीत महाराष्ट्राच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ने सहावा क्रमांक तर याच श्रेणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आठवे स्थान प्राप्त केले आहे.

सरकारी महाविद्यालये/ संस्था (सरकारी आणि सरकार अनुदानित ) (तंत्र) यामध्ये सर्वोच्च पाचमध्ये महाराष्ट्रातील  अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेने प्रथम स्थान पटकावले आहे. याच श्रेणीत मुंबई येथील वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटने पाचवे स्थान मिळवले आहे.

विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठे (विना अनुदानित/ खाजगी ) (तंत्र) या वर्गवारीत महाराष्ट्राच्या सिम्बॉयसिस इंटरनॅशनल ने दहावे स्थान मिळवले आहे.

खाजगी महाविद्यालये/ संस्था ( विना अनुदानित/ खाजगी)(तंत्र) या श्रेणीत महाराष्ट्राच्या जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगने पहिले स्थान मिळवले आहे.

एआरआयआयए 2021 च्या तपशीलवार निकाल इथे पाहता येईल-  https://www.ariia.gov.in/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *