दुबईत सुरू असलेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताचा श्रीलंकेशी सामना होणार आहे.
दुबई : अंडर 19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा श्रीलंकेशी सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता 50 षटकांचा सामना सुरू होईल.
काल दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला तर श्रीलंकेने पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. शेख रशीदच्या 108 चेंडूत नाबाद 90 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा 103 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 243 धावा केल्या. शेख रशीद व्यतिरिक्त विकी ओस्तवाल (नाबाद २८), कर्णधार यश धुल (२६) आणि राज बावा (२३) यांनीही भारतासाठी मोलाचे योगदान दिले.
बांगलादेशसाठी रकीबुल हसन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याने 10 षटकांत 41 धावा देत तीन बळी घेतले.
244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 38.2 षटकांत 140 धावांत गारद झाला. बांगलादेशकडून आरिफुल इस्लामने सर्वाधिक ४२ धावा केल्या, तर सलामीवीर महफिजुल इस्लामने २६ धावा केल्या.
भारतातर्फे राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार, राज बावा आणि विकी ओस्तवाल यांनी अनुक्रमे दोन, तर कौशल तांबे आणि निशांत सिंधूने प्रत्येकी एक गडी बाद केला.