१५ ते १८ वर्षं वयोगटातल्या मुलांची कोरोना लसीकरीता आजपासून नोंदणी.
दिल्ली : देशातल्या १५ ते १८ वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठीची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होत आहे. १५ ते १८ वयोगटाच्या मुलांना येत्या सोमवारपासून कोवॅक्सीन लसीची मात्रा दिली जाईल. त्यासाठी कोवीन पोर्टलवर नोंदणी करताना त्यांना आपलं शाळेचं ओळखपत्र अथवा आधार कार्ड वापरता येईल. लसीकरणाच्या या टप्प्यात देशातली १५ ते १८ वयोगटाची अंदाजे ६ ते ७ कोटी मुलं लसीकरणासाठी पात्र ठरतील.
आरोग्य सेवक, पुढल्या फळीतले कर्मचारी आणि ६० वर्षावरच्या सह-व्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या कोवीन खात्याच्या माध्यमातून सुरक्षिततेसाठीची बुस्टर लस मात्रा घेता येईल. या गटातल्या नागरिकांचं लसीकरण येत्या १० जानेवारी पासून सुरु होईल. पात्र नागरिकांना लसीकरणासाठी कोवीन प्रणालीकडून एस-एम-एस पाठवला जाईल.
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी देखील आता कोविडप्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून त्यांच्या कुटुंबियांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. कोविन पोर्टलवर आजपासून त्याकरता नोंदणी करुन देशाचं भविष्य सुरक्षित करावं असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.