राज्यात १२ हजार १६० नवे कोरोना रुग्ण.
‘मुंबई: राज्यात काल १२ हजार १६० नवे कोरोना रुग्ण आढळले, यापैकी ८ हजार ८२ रुग्णांची नोंद मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे.मात्र मुंबईत आज आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर केवळ ५७४ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
आज मुंबईत ६२२ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं तर दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मुंबईत अतिदक्षता विभागातील त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन संलग्न खाटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे.
काल राज्यभरात एकूण ७४ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. यापैकी मुंबईत ४० , पुणे महानगरपालिका क्षेत्रात १४, पुणे ग्रामीण आणि पनवेल इथं प्रत्येकी तीन आणि कोल्हापूर , नवी मुंबई, रायगड आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी एका ओमायक्रॉन बाधीत रुग्णाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत ५७८ ओमायक्रॉन बाधीत रुग्ण आढळले असून २४९ जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात काल १ हजार ७४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ५ शतांश टक्के आहे तर आज ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात एकूण ५२ हजार ४२२ कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात आज मालेगाव आणि धुळे महानगरपालिका क्षेत्रात तसंच वर्धा, वाशीम आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.