केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी आज मुंबईसह राज्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि ओमायक्रॉन या बाबत घेतला आढावा.
व्हायरस विरोधातील लढा आहे हे लक्षात घेऊन सर्वांना सतर्क राहण्याचे केले आवाहन.
मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी मुंबई आणि राज्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि ओमायक्रॉन या बाबत राज्यसरकारच्या अधिकार्याबरोबर आढावा बैठक घेतली.
राज्यात कोविडचे रुग्ण मागच्या काही आठवड्यात वाढत आहेत त्याबरोबरच ओमायक्रॉनचे रुग्ण देखील वाढत आहेत असे सांगत आताच काळजी घेतली तर आणखी होणारा प्रसार रोखता येईल असे डॉ. पवार म्हणाल्या.
रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावे यासंदर्भात तसेच आयसीयु आणि अन्य बेडस यांची उपलब्धता याबाबत केंद्राने यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातील रुग्ण्संख्या अतिशय वेगाने वाढत आहे,त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव हे सातत्याने सर्व राज्यातील आरोग्य सचिवांशी चर्चा करत आहेत आणि बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या असून चाचणी किट्स खरेदी करण्यासाठी राज्यांना निधी दिला आहे याशिवाय केंद्राने लसींसह इतरही सर्व मागितलेली मदत दिलेली आहे, त्याचा सुयोग्य वापर आणि अंमलबजावणी करणे हे राज्याचे काम आहे, असे त्या म्हणाल्या.
राज्यातील यासंदर्भातील कामे संथ गतीने सुरू असून त्याची गती वाढवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्राने दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य निधी पैकी किती खर्च झाला त्याची माहिती दिली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुंबईमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे ही काळजीची गोष्ट असून हा व्हायरस विरोधातील लढा आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क रहायला हवे,मार्गदर्शक सुचनाचे पालन करायला हवे, असे त्या म्हणाल्या