शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा.
मुंबई : चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने १० लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांशी संपर्कात राहून नवीन प्रवासी सुविधा निर्माण केल्यामुळे हे लक्ष्य साध्य करता आले.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमातळावरून ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली होती. या विमानसेवेने ३ जानेवारी २०२२ रोजी १० लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे.
हे लक्ष्य संपादन करताना शिर्डी विमानतळावर जवळपास १३ हजार विमान उड्डाणांची नोंद करण्यात आली. टाळेबंदीमुळे मागील काही महिने शिर्डी विमानतळ बंद होते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शिर्डी विमानतळावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
राज्यात पुणे, मुंबई, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर शिर्डी हे चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ आहे. शिर्डी विमानतळावर स्पाइस जेट, इंडिगो एअरलाईन्सची सेवा दिल्ली – हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणांसाठी सुरु करण्यात आली.