दोन लसमात्रा न घेणाऱ्यांना शासकीय व खाजगी आस्थापनात प्रवेश नाही.

Omicron variant of Covid-19

दोन लसमात्रा न घेणाऱ्यांना शासकीय व खाजगी आस्थापनात प्रवेश नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार.

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक.

येत्या ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद.Omicron variant of Covid-19

पुणे : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि ३० जानेवारी २०२२ पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते.

श्री.पवार म्हणाले, ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. १०५ देश, भारतातील २३ राज्ये आणि राज्यातील ११ ठिकाणी ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर १८ टक्के आला आहे. या पार्श्वभूमीवर ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू ठेवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दोन लसमात्रा नाही, तर प्रवेश नाही

नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये ‘दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही’ या नियमाचे बंधन घालण्यात यावे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापना चालकांनी लशीच्या दोन मात्रेशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

मुखपट्टी नसेल दर दंड निश्चित

कोविडपासून बचावासाठी मुखपट्टीचा (मास्क) उपयोग आवश्यक आहे. त्यामुळे मुखपट्टी न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने थुंकणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारण्यात यावा आणि या निर्देशाचे कठोरतेने पालन करावे, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी थ्री प्लाय किंवा एन ९५ प्रकारच्या मुखपट्टीचा वापर करावा, अन्य प्रकारची मुखपट्टी (मास्क) सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने त्याचा उपयोग टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘ओमीक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय-आरोग्यमंत्री राजेश टोपे’

ओमीक्रॉनचा संसर्ग झाल्यास बाधित व्यक्तीचा विलगीकरण कालावधी आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. संसर्ग वाढल्यास लागणारे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याविषयीदेखील केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. कोविडचा संसर्ग वाढल्यास उपचारासाठी आवश्यक औषधांची उपलब्धता तातडीने करून देण्यात येईल. पात्र नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा त्वरीत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. पुणे जिल्ह्याने लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लशीच्या पहिल्या मात्रेचे १०४ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ओमीक्रॉनचे ११३ रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *