राष्ट्रीय आरोग्य मोहिमेद्वारे कोरोना व्यवस्थापनासाठी आतापर्यंत ५० टक्के निधी वितरित केल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण.
दिल्ली: कोविड-१९ चा सामना करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि आरोग्य व्यवस्था तयारी पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत केंद्रसरकारनं फक्त २६ पूर्णांक १४ शतांश टक्के निधी वितरित केल्याचं वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे.
राष्ट्रीय आरोग्य मोहिमेद्वारे आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणजे ५० टक्के निधी वितरित केला आहे. त्यापैकी १ हजार ६८९ कोटी रुपये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी याआधीच खर्च केले आहेत. वितरीत केलेल्या निधीपैकी किमान ५० टक्के निधीचा वापर आणि प्रगतीच्या आधारावर उर्वरित निधीही वितरित केला जाणार आहे.
आतापर्यंत पाच राज्यांनी ५० टक्क्यापेक्षा जास्त निधी खर्च केला आहे. राज्यांनी या आरोग्य-पॅकेजची वेगानं अंमलबजावणी करावी, यासाठी केंद्रसरकार सक्रियतेनं पाठपुरावा करत आहे, असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळानं गेल्यावर्षी जुलैमधे, येत्या मार्च अखेरपर्यंत राबवण्यासाठी २३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं पॅकेज मंजूर केलं होतं. या योजने अंतर्गत राज्यांना २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या उद्दिष्टासाठी खर्च करायची असून, त्यापैकी १२ हजार कोटी रुपये केंद्रसरकार पुरवणार आहे, तर ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा बोजा राज्यांनी उचलायचा आहे.