जोहान्सबर्ग कसोटीत पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची भारतावर २७ धावांची आघाडी.
जोहान्सबर्ग : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताला ५८ धावांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं २ बाद ८५ धावा केल्या होत्या. के एल राहुल ८ तर मयंक अग्रवाल २३ धावा करुन बाद झाला. चेतेश्वर पुजारा ३५ आणि अजिंक्य रहाणे ११ धावांवर खेळत होता.
त्यापूर्वी आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं कालच्या १ गडी बाद ३५ या धावसंख्येवरून आपला डाव पुढे सुरु केला.
इल्गार आणि पीटरसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची, तर पाचव्या गड्यासाठी, टेंबा आणि कायले यांनी अर्धशतकी भर घातल्याचा अपवाद वगळता, आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले.
मात्र धावसंख्या हलती राहिल्यानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात भारतावर आघाडी घेणं शक्य झालं होतं. दक्षिण आफ्रिकेचा संघ २२९ धावा करून तंबूत परतला.
भारताच्या शार्दुल ठाकूर यानं पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये ५ गडी बाद केले. त्यानं कारकिर्दीतली आपली सर्वोच्च कामगिरी नोंदवत ६१ धावांमध्ये ७ गडी बाद केले.