मेसर्स शाओमी (Xiaomi) टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे 653 कोटी रुपयांच्या सीमाशुल्काची चुकवेगिरी
Evasion of Customs duty of Rs. 653 crore by M/s Xiaomi Technology India Private Limited.
नवी दिल्ली : मेसर्स शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (शाओमी इंडिया ) कंपनी कमी मूल्यमापन करून सीमाशुल्क चुकवत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे, शाओमी इंडिया आणि या कंपनीशी करारबद्ध असलेल्या उत्पादकांविरुद्ध महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय ) तपास सुरू केला.
या तपासादरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने शाओमी इंडिया कंपनीच्या परिसराची झडती घेतली. यावेळी जी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली त्यावरून असे सूचित होते की, एका करारांतर्गत, शाओमी इंडिया कंपनी क्वालकॉम यूएसए कंपनीला आणि बीजिंग शाओमी मोबाईल सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेडला स्वामित्व शुल्क आणि परवाना शुल्क पाठवत होती. शाओमी इंडिया आणि या कंपनीशी करारबद्ध असलेल्या उत्पादकांच्या प्रमुख व्यक्तींचा जबाब नोंदवण्यात आला , यादरम्यान शाओमी इंडियाच्या एका संचालकाने या देयकांसंदर्भात पुष्टी दिली.
शाओमी इंडियाद्वारे क्वालकॉम यूएसए आणि बीजिंग शाओमी मोबाईल सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेडला(शाओमी इंडियाशी संबंधित कंपनी ) दिलेले “स्वामित्व आणि परवाना शुल्क ” हे शाओमी इंडिया आणि या कंपनीशी करारबद्ध असलेल्या उत्पादकांनी आयात केलेल्या वस्तूंच्या व्यवहार मूल्यामध्ये जोडले जात नव्हते, हे या तपासादरम्यान समोर आले.
महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या तपासात पुढे असे दिसून आले की, शाओमी इंडिया हि कंपनी एमआय ब्रँडखाली मोबाइल फोनची विक्री करते आणि हे मोबाइल फोन एकतर शाओमीद्वारे आयात केले जातात किंवा शाओमी इंडियाशी करारबद्ध असलेल्या उत्पादकांद्वारे मोबाइल फोनचे सुटे भाग आणि घटक आयात करून भारतात मोबाईल फोनची जोडणी केली जाते. करारानुसार ,करारबद्ध असलेल्या उत्पादकांनी उत्पादित केलेले एमआय ब्रँडच्या मोबाइल फोनची विक्री केवळ शाओमी इंडिया कंपनीलाच केली जाते.
महसूल गुप्तचर संचालनालयाने तपासादरम्यान संकलित केलेल्या पुराव्यांवरून असे सूचित होते की, शाओमी इंडिया किंवा या कंपनीशी करारबद्ध असलेल्या उत्पादकांनी, आयात केलेल्या वस्तूंच्या मूल्यमापन मूल्यांमध्ये, शाओमी इंडिया किंवा या कंपनीशी करारबद्ध उत्पादकांनी स्वामित्व शुल्क देण्याच्या रकमेचा समावेश केलेला नाही, हे सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 14 आणि सीमाशुल्क मूल्यांकन (आयात केलेल्या वस्तूंच्या मूल्याचे निर्धारण) नियम 2007 चे उल्लंघन करते.व्यवहार मूल्यामध्ये “स्वामित्व आणि परवाना शुल्क” न जोडता शाओमी इंडिया कंपनी अशा आयात केलेल्या मोबाईल फोनचे, त्याच्या सुट्या भागांचे आणि घटकांचे लाभप्रद मालक म्हणून सीमाशुल्क चुकवत आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने तपास पूर्ण केल्यानंतर,सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत, 01.04.2017 ते 30.06.2020 या कालावधीतील 653 कोटी रुपयांच्या मागणी आणि शुल्काच्या वसुलीसाठी मेसर्स शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला तीन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.