Deputy Chief Minister Ajit Pawar’s instructions to the administration to take measures against the backdrop of increased corona infection.
तज्ज्ञांनी दिलेल्या कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या, प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना.
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्यानं, परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
आरोग्य यंत्रणेनं सज्ज रहावं, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयानं काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. राज्यातलो नवीन कोरोना विषाणूबाबत सद्यस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी योग्य प्रकाराच्या मास्कचा वापर, आरोग्य यंत्रणेकडे असलेलं मनुष्यबळ, प्रमाणित उपचार पध्दती, विलगीकरण कालावधी आदी विषयांवर कोविड टास्कफोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी विस्तृत चर्चा केली.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवावी, सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना, त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करावी, कोरोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयं सज्ज ठेवावीत, उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसंच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.