More than 15,000 patients in Mumbai.
मुंबईत उच्चांकी १५ हजारांहून अधिक रुग्ण.
मुंबई: राज्यात काल कोरोनाच्या २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ५ हजार ३३१ रुग्ण बरे झाले. राज्यात काल कोरोनामुळं ८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ५ लाखांहून अधिक जण गृह विलगीकरणात आहेत.
राज्यात काल कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे १४४ रुग्ण आढळून आले. यापैकी सर्वाधिक १०० रुग्ण मुंबई, ११ नागपुरात, ठाणे आणि पुणे शहरात प्रत्येकी ७, पिंपरी चिंचवडमध्ये ६, कोल्हापुरात ५ रुग्ण आढळून आले. अमरावती, उल्हासनगर, भिवंडीमध्ये प्रत्येकी २ तर पनवेल आणि उस्मानाबादमध्ये काल ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूची बाधा झालेला प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला.
राज्यात आतापर्यंत ७९७ जणांना ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूची बाधा झाल्याचे निदान झाले असून त्यापैकी ३३० रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईत काल १५ हजार १६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. ६० हजारांहून अधिक चाचण्यांमध्ये हे रुग्ण आढळून आले. गेल्यावर्षी देशात कोरोना विषाणूचा संसर्ग आढळल्यापासून आतापर्यंतची मुंबईतली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मुंबईत आज कोरोनामुळं ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आणि ७१४ जण बरे झाले.
मुंबईत काल आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी ८७ टक्के रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याची कुठलीही लक्षणं नाही. आज मुंबईत १ हजार २१८ कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्यापैकी ८० जणांना ऑक्सिजनची गरज लागली. सध्या मुंबईतल्या एकूण खाटांपैकी सुमारे साडे १४ टक्के खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत.