Now there will be a ‘Book Village’ in every district.
आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’.
मुंबई : थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरी मिळण्याचे ठिकाण या सोबतच आता भिलारची ओळख पुस्तकांचे गाव म्हणून तयार झाली आहे. भिलार प्रमाणेच तुम्ही तुमच्या आवडत्या पर्यटन ठिकाणी गेलात, किंवा तीर्थस्थळी गेलात तर त्या जिल्ह्यातील एका गावात तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके वाचू शकणार आहात. भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभे राहणार आहे.
“हे ऑन वे” या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर राज्यात “पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली. पुस्तकांचे गाव या योजनेचे आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी या उद्देशाने ही संकल्पना मे 2017 मध्ये आकारास आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी या संकल्पनेचा विस्तार करण्याचा निर्धार केला. त्यासाठी मराठी भाषेचा विकास, प्रचार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या दृष्टीने व मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी तसेच पुस्तकाचे गाव हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविण्याच्या उद्देशाने सन 2019-20 या वर्षापासून पुस्तकाचे गाव या योजनेस व या योजनेची भविष्यातील व्यापकता लक्षात घेऊन त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडून निधीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि मंत्रिमंडळाची मान्यता
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, ‘पुस्तकांचे गाव भिलार’ ही योजना राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत स्वतंत्र उपक्रम म्हणून राबविण्यास व पायाभूत सुविधांवरील खर्च कमी करून लोकसहभागातून पुस्तकाचे गाव योजनेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव योजना सुरू झाली. या योजनेचा विस्तार करण्यासंदर्भात दि. 15.12.2021 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. याबाबत आता शासन निर्णय जारी झाला आहे.