Changes in restrictions in the state from tomorrow to prevent the spread of corona.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात उद्यापासून होणाऱ्या निर्बंधामधे सुधारणा.
मुंबई: राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं उद्यापासून लागू केलेल्या निर्बंधांमध्ये काही सुधारणा आज जाहीर केल्या आहेत. याआधी व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृहं पूर्णपणे बंद राहतील असं म्हटलं होतं.
मात्र, आज त्यात सुधारणा करून व्यायाम शाळा, सौंदर्य प्रसाधनगृहं ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवायला सरकारनं परवानगी दिली आहे. केशकर्तनालयं, मॉल्स, बाजार संकुलं यांना ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यासाठी याआधी दिलेली परवानगी कायम आहे. मात्र, त्यासाठी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करावं लागेल.
जलतरण तलाव, मनोरंजन उद्यानं, प्राणीसंग्रहालय, वस्तुसंग्रहालयं, किल्ले, स्थानिक पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद राहतील. पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहिल. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावशक सेवा वगळता कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. लग्नसमारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना, तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल.
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना कमाल ५० जण उपस्थित राहू शकतील. शाळा, महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. यात केवळ राज्यमंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या केवळ १० वी १२ वीच्या परीक्षा तसंच इतर सरकार शैक्षणिक विभागांकडून घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना, नियोजित कृती कार्यक्रमांना अपवादात्मक स्थितीत परवानगी असेल.