The service does not have caste religion, party-creed.
सेवेला जात-धर्म, पक्ष-पंथ नसतो : डॉ.श्रीपाल सबनीस
विद्यापीठातर्फे गिरीश प्रभुणे व नामदेव कांबळे यांना कृतज्ञता सन्मान
पुणे:- सेवेला जात-धर्म, पक्ष-पंथ नसतो, सेवा हे समर्पण असून डाव्या किंवा उजव्या विचारसरणीच्या शिक्क्याने सेवाभाव बाधित करणे अयोग्य असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन व मातंग साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे व ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते नामदेव कांबळे यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ.नितीन करमळकर, विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य राजेश पांडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, डॉ.देविदास वायदंडे, विवेक बुचडे, डॉ.अंबादास सगट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ.सुनील भंडगे, मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यातील ३३ साहित्यिकांच्या साहित्यकृतीला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाङ्मय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
डॉ.सबनीस पुढे म्हणाले, आता प्रतिभावंत लेखक, कलावंतांनी सत्यनिष्ठ आणि विवेकनिष्ठ समाजाची उभारणी करावी. ‘उजवे-डावे’ करण्यापेक्षाही माणूसपण महत्वाचे आहे.
पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, भटक्या विमुक्तांसाठी केलेले शैक्षणिक कार्य मनाला आनंद देणारे आहे. त्यांच्या जीवनातील संघर्ष अजूनही संपलेला नाही, त्यासाठी काम करत राहणे हाच आजच्या सत्काराचा मला समजलेला अर्थ आहे.
पद्मश्री नामदेव कांबळे म्हणाले, मला प्रामुख्याने माझ्या ‘राघववेळ’ कादंबरीने आणि अन्य सामाजिक साहित्यकृतीमुळे पद्मश्री पुरस्कार मिळाला, त्याची दखल पुणे विद्यापीठाने घेतली, याचा जास्त आनंद झाला आहे.
यावेळी डॉ. एकबोटे यांचेही भाषण झाले.
या कार्यक्रमात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कारार्थींमध्ये मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. बळीराम गायकवाड, समरसता साहित्य परिषदेचे रविंद्र गोळे, दादासाहेब सोनवणे, डॉ.सौ.उज्वला हातागळे, डॉ.सुशील चिमोरे, डॉ.बालाजी समुखराव, अॅड.श्रीधर कसबेकर, संपत जाधव, प्रा.वैजनाथ सुरनर, सतिश नाईकवाडे, जालिंदर कांबळे आदींच्या ३३ साहित्यकृतींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुनिल भंडगे यांनी केले, सूत्रसंचालन मातंग साहित्य परिषदेचे डॉ.धनंजय भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.विजय रोडे यांनी केले.