Restrictions in the state will remain in place for at least another month due to the growing number of corona patients.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं अजून किमान महिनाभर राज्यातले निर्बंध कायम राहणार.
मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अजून एक महिनातरी राज्यातले निर्बंध कायम राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर इतक्यात तरी राज्यातल्या शाळाही सुरु करायचा विचार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. अनेक लोक घरीच चाचणी करत आहेत मात्र त्याचे निकाल प्रशासनाला कळवत नाहीत. अशा लोकांनी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महानगरपालिकेला त्वरीत कळवावी, असं आवाहन त्यांनी केलं.
सध्या राज्यातल्या एकूण कोरोनारुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर १४ टक्के रुग्णालयात दाखल आहेत. राज्यात ४० मेट्रिक टन ऑक्सीजनची गरज भासत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या ९० टक्के लोकांना कोरोनाप्रतिबंधक लशीची पहिली मात्रा दिली आहे. तर, ६२ टक्के लोकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण वेगानं करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राज्यात लशींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून, कोवीशील्डच्या ६० लाख तर, कोवॅक्सीनच्या ४० लाख मात्रांची गरज आहे. केंद्रसरकारकडे या लशींची मागणी करणार असल्याचं ते म्हणाले.