BIS officials raid Metro Cash & Carry India (Pvt) Ltd for Misuse of ISI mark.
आयएसआय मार्कचा गैरवापर केल्याप्रकरणी बीआयएस अधिकाऱ्यांचा मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया (प्रा.) लिमिटेडवर छापा.
मोठ्या प्रमाणात अप्रमाणित खेळणी जप्त.
मुंबई: भारतीय मानक ब्युरोच्या (BIS), मुंबई शाखा कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मुंबईतल्या बोरिवली पूर्व इथल्या मे. मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया (प्रा.) लिमिटेडवर गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करून ISI प्रमाणचिन्हाचा गैरवापर केल्याबद्दल 13.01.2022 रोजी छापा घालून मोठ्या प्रमाणात अप्रमाणित खेळणी जप्त केली.
हे दुकान, भारत सरकारने जारी केलेल्या खेळण्यांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करून, प्रमाणचिन्हांशिवाय (BIS स्टँडर्ड मार्क) इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक खेळण्यांची विक्री करताना आढळले.
मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, 01-01-2021 पासून देशात विकली जाणारी सर्व खेळणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी BIS द्वारे प्रमाणित केली जाणे आणि त्यांच्यावर प्रमाणचिन्ह असणे बंधनकारक असल्याची अधिसूचना भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे.
भारत सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन दंडनीय गुन्हा आहे. याप्रकरणी BIS कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000 रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
उत्पादक, वितरक आणि व्यापार्यांना बीआयएसच्या प्रमाणपत्राशिवाय खेळण्यांचे उत्पादन आणि विक्री करू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
प्रमाणित उत्पादक आणि उत्पादनांच्या तपशीलांसाठी ग्राहकांना BIS केअर अॅप वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे.