Graduates should set high goals and strive for a self-reliant India: Governor Bhagat Singh Koshyari.
स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
मुंबई :- पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम केल्यास विलक्षण प्रगती करता येईल. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येकाने आत्मनिर्भर झाले पाहिजे तसेच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
पुणे येथील श्री बालाजी (अभिमत) विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने संपन्न झाला, त्यावेळी राजभवन मुंबई येथून सहभागी होताना राज्यपाल बोलत होते. .
दीक्षान्त समारंभाला श्री बालाजी विद्यापीठ पुणे येथून एअर मार्शल भूषण गोखले (सेवानिवृत्त), अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, श्री बालाजी विद्यापीठाचे प्रकुलपती बी. परमानंदन, कुलगुरु डॉ. जी. के. शिरुडे तसेच दूरस्थ माध्यमातून कॉल हेल्थ कंपनीचे मुख्याधिकारी टी. हरी, ओनिडा इंडियाचे माजी प्रमुख यशो वर्मा, शिक्षक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.
आपण केवळ नोकरी व रोजगार मिळविण्यासाठी पदवी घेतली का याचा स्नातकांनी विचार करून डोळ्यांपुढे मोठे लक्ष्य ठेवले पाहिजे. जीवनात अपयश आले तरी न डगमगता अधिक परिश्रम करून यश प्राप्त केले पाहिजे. शिक्षणाला संस्कार व नीतिमूल्यांची जोड दिल्यास विद्यार्थी चांगले नागरिक होतील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
संरक्षण दल न म्हणता सशस्त्र सैन्य दल म्हणावे : एअर मार्शल भूषण गोखले
भारतीय लष्कराला संरक्षण दल न म्हणता सशस्त्र सैन्य दल म्हणणे योग्य आहे असे मत सेवानिवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी यावेळी मांडले. ‘संरक्षण’ हा शब्द बचावात्मक पवित्रा दर्शवतो तर ‘सशस्त्र सैन्य दल’ आत्मविश्वास जागवतो असे त्यांनी सांगितले. लढाऊ पायलटप्रमाणे युवकांनी उच्च ध्येय ठेवावे मात्र ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्या समाजासाठी कार्य करावयाचे असल्यामुळे आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवावे असे त्यांनी सांगितले.
श्री बालाजी विद्यापीठाचे 22000 माजी विद्यार्थी जगभर विविध ठिकाणी चांगले कार्य करीत असून विद्यापीठाचे संस्थापक डॉ. कर्नल बालसुब्रमण्यम यांनी महिला सक्षमीकरणाला विशेष महत्त्व दिल्याचे प्रकुलपती बी. परमानंदन यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. जी. के. शिरुडे यांनी यावेळी विद्यापीठाच्या अहवालाचे सादरीकरण केले. यावेळी २०१९-२१ तुकडीच्या स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तर गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.