More than 41,000 corona patients were registered in the state on Sunday.
राज्यात रविवारी ४१ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद.
मुंबई: राज्यात आज ४१ हजार ३२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ४० हजार ३८६ रुग्ण बरे झाले. राज्यात आज २९ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.
राज्यातल्या ८ जणांना आज ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त असून हे सर्व जण पुणे जिल्ह्यातले आहे.
राज्यात सध्या २ लाख ६५ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातले सर्वाधिक रुग्ण अनुक्रमे ठाणे, मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आहेत.
जवळपास २ आठवड्यांनंतर मुंबईत आज १० हजारापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आज ५७ हजारांहून अधिक चाचण्यांमधून सुमारे ७ हजार ९०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. तर २१ हजारांहून अधिक रुग्ण आज बरे झाले. मुंबईतल्या एकूण रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत आणि ६८८ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मुंबईत आज ११ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला यातले १० जण ज्येष्ठ नागरिक होते.
पुणे शहरात आज ५ हजार ३०० हून अधिक कोरोना बाधित आढळून आले. पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे अडीच हजार आणि पुणे जिल्ह्यात एकवीसशेहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. नागपूर शहरात सुमारे अठराशे तर जिल्ह्यात पावणे ५०० नवे रुग्ण आढळले. ठाणे शहरात १८२५, जिल्ह्यात ७१२, नवी मुंबईत सुमारे १८ शे, पनवेलमध्ये १६ शेहून अधिक कोरोनाबाधित एका दिवसात आढळले. नाशिक शहरातही सुमारे १७ शे आणि नाशिक जिल्ह्यात १२ शे हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली.
दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.