The Legendary Kathak Dancer Pandit Birju Maharaj Passed Away.
सुप्रसिद्ध कथक सम्राट पंडित बिरजू महाराज यांचं निधन.
नवी दिल्ली : सुप्रसिद्ध कथक सम्राट, नृत्य गुरु पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचं काल रात्री नवी दिल्ली इथं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते.
लखनौ घराण्याचे पंडित बिरजू महाराज यांचं मूळ नाव ब्रिजमोहन मिश्रा; त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ मध्ये लखनौ इथं झाला.
आपले वडील अच्छन महाराज यांच्याकडून त्यांनी कथकचे धडे घेतले. लय तालाची नैसर्गिक देणगी लाभलेले पंडित बिरजू महाराज हे शास्त्रीय संगीत आणि पखवाज वादनातही निपुण होते.
आपल्या कालाश्रम या संस्थेच्या माध्यमातून अनेक कथक कलाकार घडवण्याचं कार्य त्यांनी केलं.
राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी यासारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शनही केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
बिरजू महाराज यांच्या निधनानं एका पर्वाचा अंत झाला असून भारतीय संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आपल्या अजोड नृत्य कौशल्यामुळे बिरजू महाराज जगभरातल्या कलाप्रेमींसाठी एक प्रेरणा स्थान होते असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं जागतिक कला क्षेत्राची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य नृत्यकलेला समर्पित करताना भारतीय शास्त्रीय नृत्य अधिक लोकाभिमुख केले. अभिजात शास्त्रीय नृत्याचे ते आंतरराष्ट्रीय राजदूत होते. बिरजू महाराज प्रयोगशील होते व अनेकदा त्यांनी नवतेचा अंगिकार केला. संगीत व तबल्याची विशेष जाण असलेल्या पं. बिरजू महाराजांचा महाराष्ट्राशी घनिष्ठ स्नेह होता.
अनेक शिष्योत्तम घडवून त्यांनी आपले ज्ञान मुक्तपणे वाटले व गुरुसेवा केली. पंडित बिरजू महाराज यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या शिष्यपरिवार तसेच कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
कथक सम्राट बिरजू महाराज एक सर्जक कला उपासक होते. त्यांचं कला-रसिकांच्या हृदयातलं स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
बिरजू महाराज हे भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य क्षेत्रातलं स्वतंत्र विद्यापीठ होतं. त्यांनी कथ्थक नृत्यकलेला देशात आणि सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.