महाराष्ट्राचे माजी मंत्री, ज्येष्ठ शेकाप नेते प्रा. एन डी पाटील यांचे निधन. मान्यवरांची श्रद्धांजली.

Former Maharashtra minister  Prof. N D Patil passes away.

महाराष्ट्राचे माजी मंत्री, ज्येष्ठ शेकाप नेते   प्रा. एन डी पाटील यांचे निधन.Former Maharashtra minister  Prof.N D Patil passes away.

कोल्हापूर : माजी सहकार मंत्री राहिलेले आणि टोलविरोधी मोहिमेसह अनेक आंदोलनांचे नेतृत्व करणारे महाराष्ट्रातील पुरोगामी आणि तर्कशुद्ध नेते  प्रा. एन डी पाटील यांचे  कोल्हापूरातल्या खासगी रुग्णालयात सोमवारी निधन झाले.

त्यांच्यावर उद्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहे. कोरोना नियमांमुळं त्यांची अंत्ययात्रा निघणार नाही मात्र सकाळी ८ ते २ दरम्यान त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. केवळ २० जणांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार केले जाणार असल्यानं अंत्यसंस्काराला गर्दी करु नये, अंत्यदर्शन घ्यावं असं आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे.

 सांगली जिल्ह्यातल्या ढवळी इथं 15 जुलै 1929 रोजी  जन्मलेल्या एन डी पाटील यांचं संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राला ते एन डी पाटील याच नावानं परिचित होते. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली होती.

मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल झाले. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. पुणे विद्यापीठातून त्यांनी एलएलबीही पूर्ण केले. त्यांनी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. ते ‘कमवा आणि शिका’ योजनेचे प्रमुख आणि रेक्टरही होते. 1960 मध्ये त्यांनी केबीपी कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून काम केले. शिवाजी विद्यापीठात कार्यरत असताना त्यांनी प्रथम सल्लागार समितीसारख्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते सिनेटचे सदस्य होते.

ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या समाजशास्त्र विभागाचे माजी डीनही आहेत. १९५९ पासून ते रयत शिक्षण संस्था साताऱ्याच्या व्यवस्थापकीय परिषदेचे सदस्य होते. 1990 ते 2008 या काळात त्यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.

ते 18 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते.  राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यांनी शेकापचे सरचिटणीसपदही भुषवलं.  विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन. डी. पाटील यांना प्रचंड आस्था होती. त्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सीमा भागातल्या मराठी भाषिकांना त्यांना मोठा आधार वाटायचा. एन. डी. पाटील देखील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात सातत्यानं आवाज उठवत. त्याशिवाय, लोकांसाठी झालेल्या अनेक लढ्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

१९७८ ते १९८० या काळात त्यांनी पुलोद सरकारमध्ये राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. 1999-2002 दरम्यान, ते पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे निमंत्रक होते, ज्यामध्ये PWP हा घटक होता. पाटील यांनी कर्नाटकसोबतच्या सीमावादाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या कायदेशीर समितीचेही नेतृत्व केले होते.

 श्रद्धांजली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रा. एन डी पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत. दिवंगत प्रा. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली.

उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतिशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. प्रा.एन. डी.पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा.एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत प्रा.एन. डी.पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *