दुबईतल्या जागतिक प्रदर्शनातल्या MSME दालनाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन.

Inauguration of MSME Gallery at World Exhibition in Dubai by Narayan Rane.

दुबईतल्या जागतिक प्रदर्शनातल्या MSME दालनाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन.Inauguration of MSME Gallery at World Exhibition in Dubai by Narayan Rane.

नवी दिल्‍ली : दुबईत आयोजित जागतिक प्रदर्शनातल्या एमएसएमई दालनाचं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून आभासी पद्धतीनं केलं. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं तयार केलेल्या ‘खादी इंडिया’ या चित्रपटाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं. रोजगार निर्मितीमधे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रानं उल्लेखनीय भूमिका बजावली आहे, तसंच कारखानदारीचा पाया विस्तारला आहे, असं राणे यांनी यावेळी सांगितलं. सध्या या क्षेत्रात सहा कोटीपेक्षा जास्त युनिट्स असून त्याद्वारे ११ कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे.

मानवी प्रतिभेची झेप आणि मानवाला निरनिराळ्या बाबतीत मिळालेले यश साजरे करण्यासाठी जगातील लक्षावधी लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ‘वर्ल्ड एक्स्पो, 2020 दुबई’ हा मेळावा भरवण्यात आला आहे. मनामनांना जोडून उज्ज्वल भवितव्याची निर्मिती करण्याच्या उद्देशाने, ‘कनेक्टिंग माइंड्स, क्रिएटिंग फ्युचर्स’ अशी या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना आखण्यात आली आहे. भारतातील एमएसएमई उद्योगांसाठीची व्यवस्था आणि वातावरण मांडून विविध देशांच्या सरकारांशी तसेच उद्योग व व्यापार जगतातील नेतृत्वाशी संवाद साधता यावा, या क्षेत्रात जगभर अंमलात असलेल्या चांगल्या कार्यपद्धती आणि संकल्पनांची देवाणघेवाण करता यावी, या उद्देशाने एमएसएमई मंत्रालयाने सदर मेळाव्यात भाग घेऊन मंडप उभारला आहे.

उद्घाटनपर भाषणात राणे यांनी, रोजगारनिर्मिती आणि उत्पादन क्षेत्राच्या विस्तारासाठी एमएसएमई क्षेत्राकडून मिळत असलेल्या भरीव योगदानाचे कौतुक केले. आज या क्षेत्रातील 6 कोटींपेक्षा अधिक उत्पादन एककांमध्ये 11 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. आर्थिक विकासात या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. जीडीपी म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचे 30% हून अधिक योगदान आहे. तर भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत 48% वाटा या क्षेत्राचा आहे. देशातील एमएसएमई उद्योगांना आवश्यक असणाऱ्या – निर्यात, उत्पादनाची गुणवत्ता, जीडीपीमधील योगदान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तसेच अद्ययावत तंत्रज्ञान याबाबतच्या सुविधा पुरवून देशभरातील एमएसएमई उद्योगांसाठी नवे मापदंड तयार करण्याचा मंत्रालयाचा उद्देश आहे.

एमएसएमई क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी मंत्रालयाकडून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले जात आहेत, असे राज्यमंत्री भानुप्रताप वर्मा यांनी सांगितले. पतसुविधा, क्षमताबांधणी, कौशल्य प्रशिक्षण, बाजारपेठेशी जोडून देणाऱ्या दुव्यांची सुविधा व संपर्क, तंत्रज्ञानात नवे बदल आदी विषयांमध्ये वेगाने काम करून या उद्योगांच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताच्या आर्थिक वाढीत उल्लेखनीय योगदान हे क्षेत्र देत आहे. निर्यात, उत्पादनाचा दर्जा, स्थुल राष्ट्रीय उत्पादनातलं योगदान या सर्व निकषांवर या उद्योगांना नव्या उंचीवर पोचवण्यासाठी लक्ष्य तयार करण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याकडेही सरकार लक्ष देत आहे, असं राणे यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *