Appeal to apply online for scholarship schemes through the MahaDBT portal.
शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने चालू असल्यामुळे सन २०२१-२२ करीता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची ३१ जानेवारी २०२२ अंतिम मुदत असून पात्र विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले आहे.
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर), राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग -2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य अशा राज्य शासन पुरस्कृत १४ शिष्यवृत्ती योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते.
आर्थिक वर्ष माहे मार्च २०२२ अखेर असल्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी प्रत्येक पात्र विद्यार्थीला शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास संचालनालयाच्या schol.dhepune@gov.in या ई-मेल पत्त्यावर तसेच ०२०-२९७०७०९८/२६१२६९३९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
सन २०२१-२२ मध्ये यावर्षी ३९ हजार १०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्याशिवाय शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी आणि पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहनदेखील श्री.माने यांनी केले आहे.