A ‘SMART’ planned program should be developed for the development of inclusive and competitive agricultural value chains.
शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी ‘स्मार्ट’ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा
– कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
मुंबई : लहान, सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले
बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)ची आढावा बैठक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषि आयुक्त सुनिल चव्हाण, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, आत्माचे कृषि संचालक दशरथ तांभाळे, स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषि विभागाचे उपसचिव संतोष कराड तसेच संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुंडे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ‘स्मार्ट’ प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर शेतकऱ्यांसाठी फळ व भाजीपाला स्टॉल उपलब्ध करून द्यावे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल. याचे एक मोबाईल ॲप तयार करावे. हे पुणे येथे यशस्वी झाल्यानंतर मुंबई, नवी मुंबई याठिकाणी राबविण्यात येईल. विदर्भ मराठवाड्यातील प्रमुख पिकांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यासाठी स्मार्टने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा. बाजार जोडणीसाठी शेतकरी समुदाय आधारित संस्थांना संघटित खरेदीदारांशी प्रक्रिया उद्योग, निर्यातदार, संघटित किरकोळ विक्रेते यांच्याशी थेट जोडणी आणि कमीत कमी मध्यस्थांची संख्या असलेल्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करण्यात याव्यात. कापसाबाबत एकजिनसी व स्वच्छ कापसाची निर्मिती करून निवडलेल्या जिनिंग मार्फत स्वतंत्र व वेगळ्या स्मार्ट कॉटन ब्रँड अंतर्गत मूल्यवृद्धी गाठी तयार करून त्याची ई-टेंडिंग प्लॅटफॉर्म मार्फत विक्री करावी. राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी शेतकरी उत्पादक संस्थाना त्याची व्यवसायाभिमुख क्षमता बांधणी करण्यात यावी.
तसेच हवामान अंदाजाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला पुढील वर्षी अंदाजित किती बाजारभाव मिळेल याविषयीही विभागाने अभ्यास करणे आवश्यक आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे यासाठी हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com