2 people died in an accident on Nagpur Mumbai Samriddhi Highway
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातात १२ जणांचा मृत्यू
जांबरगाव: नागपूर समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 लोक मृत्युमुखी पडले तर 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. 15 ऑक्टोबरलापहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरजवळच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हल (MH20 GP 2212) आणि ट्रक (MP09 MH 6483) यांची टक्कर होऊन हा अपघात झाला. समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टेम्पो ट्रॅव्हलमधील प्रवासी बुलढाणा येथील सैलानी बाबा यांचं दर्शन घेऊन शिर्डीला जात होते.
हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हलरचा पूर्णपणे चक्काचूर होऊन चालकासह बारा जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच वर्षाच्या मुलीचा देखील यामध्ये समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने बचाव कार्याला सुरूवात केली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व प्रवासी नाशिकमधले आहेत.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.- ; तनुश्री लखन सोळसे (वय 5 वर्षे) , संगीता विकास अस्वले (वय 40 वर्षे), अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे), रतन जगधने (वय 45 वर्षे), कांतल लखन सोळसे (वय 32 वर्षे), रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे), हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 70 वर्षे), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे), अमोल झुंबर गांगुर्डे (वय 50 वर्षे), सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे), मिलिंद पगारे (वय 50 वर्षे) आणि दीपक प्रभाकर केकाने (वय 47 वर्षे).
या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं,अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये इतकी मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसंच जखमींवर शासकीय खर्चानं योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकच्या भीषण अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांना उपमुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातात १२ जणांचा मृत्यू”