Instructions to provide necessary facilities for Agniveer Army Recruitment Rally
अग्निवीर आर्मी भरती मेळाव्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश
२० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे येथे आर्मी भरती मेळावा
बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप सेंटर खडकी येथे मेळावा होणार
पुणे : भारतीय लष्करामध्ये भरतीसाठी अग्निवीर (पुरुष व महिला मिलिटरी पोलीस) आर्मी भरती मेळाव्याचे डायरेक्टर रिक्रुटिंग, रिक्रुटिंग झोन, पुणे यांच्यामार्फत २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत देण्यात आले.
या बैठकीस हेडक्वार्टर रिक्रुटिंग झोन पुणेचे डायरेक्टर रिक्रुटिंग कर्नल व्रिजेंद्र सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह मेजर राजेश कुमार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सतीश हांगे (नि.), परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, तहसीलदार राधिका हावळ बारटक्के आदी उपस्थित होते.
हा मेळावा बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप सेंटर खडकी येथे होणार आहे. या भरती मेळाव्यासाठी पुणे, सोलापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर या सहा जिल्ह्यातून उमेदवार उपस्थित राहणार असून उमेदवारांना पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. मेळाव्याच्या ठिकाणी शामियाना, निवारा तयार करावा. मेळाव्याच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मोबाईल शौचालये, स्वच्छ पिण्याचे, वापरण्याचे पाणी आदी सुविधा कराव्यात. आरोग्य विभागाकडून डायल १०८ रुग्णवाहिका, तसेच पुरुष व महिला वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावेत. पुणे महानगरपालिकेने बसची व्यवस्था करावी, आदी सूचना श्रीमती कदम यांनी दिल्या.
यावेळी कर्नल व्रिजेंद्र सिंह यांनी भरती मेळाव्याच्या अनुषंगाने आवश्यक सुविधांबाबत तसेच अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अग्निवीर आर्मी भरती मेळाव्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश”