Sugar mills should focus on the production of alternative biofuels along with sugar
साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
पुणे : ग्रीन हायड्रोजन सारखं जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून भविष्यात साखर कारखान्यांनी साखरे बरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
पुण्याजवळील मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या परिषदेचे औपचारिक उद्घाटन झाले .
यावेळी बोलताना गडकरी पुढे म्हणाले की , एका बाजूला कृषी उत्पादनांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला असून अनेक कृषी उत्पादने मागणीपेक्षा जास्त आहेत त्यामुळे त्यांना पुरेसा भाव मिळत नाही , परिणामी शेतकऱ्यांना त्यासाठी स्वतंत्र अनुदान द्यावे लागते आणि दुसऱ्या बाजूला आपण सुमारे 80 टक्के पारंपरिक इंधन आयात करतो .आपल्या देशातील साखर उद्योग हा पूर्णपणे ब्राझील सारख्या देशावर अवलंबून असल्याने भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही, म्हणूनच साखर उद्योगाने आता साखरे ऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त जैविक इंधन म्हणून ओळखले जात असून पेट्रोल डिझेल सारख्या पारंपरिक इंधनाचा योग्य पर्याय म्हणून हे इंधन पुढे आले आहे . साखर कारखान्यांनी आता हायड्रोजन निर्मितीच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्याची गरज असून केवळ साखर उद्योगच नव्हे तर देशभरातील कृषी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन सारखे इंधन तयार करण्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.
हायड्रोजन सारख्या हरित इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र अभियान हाती घेतले असून साखर उद्योगाने त्याचा देखील फायदा घेण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.
वसंतदादा साखर संस्थेचे साखर उद्योगाला नवनवीन संशोधन पुरवण्यात मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार गडकरी यांनी यावेळी काढले.
गडकरी यांचे संस्थेत आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले .त्यानंतर त्यांनी प्रदर्शनातील अनेक स्टॉलना भेटी देऊन पाहणी केली .
जागतिक हवामान बदलाचा साखर उद्योगावर विपरीत परिणाम होत असल्याचे वसंतदादा साखर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले . जैव तंत्रज्ञान , नॅनो तंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अधिक चालना देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले .
जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता , आव्हाने आणि संधी या विषयावरील या जागतिक परिषदेला 27 देशांमधील 2 हजाराहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत .
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा”