Complete the pending works in Ambegaon taluka immediately
आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा– सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील
पुणे : केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात असून सर्व शासकीय यंत्रणानी लाभार्थ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
पंचयात समिती आंबेगाव (घोडेगाव) येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार संजय नागटिळक, प्रभारी गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. वळसे पाटील यांनी पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, उपनिबंधक कार्यालय, महावितरण आदी विभागाकडून प्रलंबित कामांची आणि योजनांची माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने पशुधनासाठी औषधोपचार अधिक वाढवावेत. तालुक्यात नवीन पशु वैद्यकीय दवाखाना सूरू करावयाचा असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. नवीन अंगणवाडी बांधकामासाठी आवश्यक ठिकाणचा प्रस्ताव तयार करावा. महिलांसाठी स्वच्छतागृह नसलेल्या ठिकाणी तशी व्यवस्था करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून बालकांना सशक्त करण्यासाठी नवसंजीवनी योजनेअंतर्गत उपाययोजना कराव्यात. लघु पाटबंधारे विभागाने नवीन बंधारे तयार करण्यासाठी नियोजन करावे. वैयक्तिक लाभाच्या योजनेवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ द्यावा. तालुका कृषी अधिकारी यांनी स्ट्रॅाबेरी लागवडीसाठी न्युक्लीअस बजेटच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी लागवडी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.
ठाकर आणि कातकरी समाजातील नागरिकांना योजनांच्या लाभासाठी कागदपत्रांची पुतर्ता करण्यासाठी सर्व विभागानी आग्रही राहून त्यांना विविध योजनांचे लाभ द्यावेत. धरण पुनर्वसन गावातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी सर्व विभागानी प्रयत्न करावेत, असे सांगून तालुक्यातील प्रलंबित कामे, विविध प्रकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानी कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा”