Army Chief Presents President’s Colours to Units of the Parachute Regiment
लष्करप्रमुखांकडून पॅराशूट रेजिमेंटच्या तुकड्यांना राष्ट्रपती ध्वज प्रदान
नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, यांनी, पॅराशूट रेजिमेंट च्या चार तुकड्यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा, ‘ प्रेसिडेंट्स कलर’ म्हणजे राष्ट्रपती ध्वज प्रदान केला. यात, 11 पॅराशूट (विशेष दल), 21 पॅराशूट (विशेष दल), 23 पॅराशूट आणि 29 पॅराशूट या चार तुकड्यांचा समावेश आहे. आज, म्हणजेच 23 फेब्रुवारी 2022 रोजी बंगळुरू इथे झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पॅराशूट रेजिमेंट ही भारतीय लष्करातील एक सर्वोत्तम रेजिमेंट असून, या रेजिमेंटने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक मोहिमांमध्ये स्पृहणीय कामगिरी केली आहे. या रेजिमेंटला याआधीही अनेक ठिकाणी, असे की गाझा, कोरिया, बांगलादेश, श्रीलंका, मालदिव, कच्छचे रण, सीयाचेन, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य भारतातील मोहिमांमध्ये -ज्यात मणिपूर, नागालैंड आणि आसामचाही समावेश आहे, तिथे पराक्रम गाजवल्याबद्दल अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. तसेच, स्वातंत्र्यानंतर या रेजिमेंटच्या तुकड्यांना 32 वेळा लष्करप्रमुख युनिट प्रशस्तिपत्र, आणि तुकडीच्या सैनिकांना शौर्य आणि विशेष पराक्रम गाजवल्याबद्दल 8 अशोक चक्र, 14 महावीर चक्र, 22 कीर्ती चक्र, 63 वीरचक्र, 116 शौर्यचक्र आणि 601 सेना पदके अशी अनेक पदके देऊन गौरवण्यात आले आहे.
यावेळी संचलनाचे निरीक्षण केल्यानंतर, लष्करप्रमुख नरवणे यांनी पॅरॅशूट रेजिमेंटचा अतुलनीय शौर्याचा समृद्ध वारसा आणि बलिदानाच्या परंपरांचा गौरव केला. यावेळी लष्करप्रमुखांनी नव्याने स्थापन झालेल्या तुकड्यांनी अल्पावधीत केलेल्या कामांचीही प्रशंसा केली. देशाची अभिमानाने सेवा करण्यासाठी, सर्व तुकड्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.