Inclusion of art education in the curriculum is the need of the hour
अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज – राज्यपाल रमेश बैस
बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित १३२ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण
मुंबई : शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षणामध्ये कला शिक्षणाचा समावेश करणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी शासनाने कला शिक्षणाची सोय करावी, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. जहांगीर आर्ट गॅलरी येथे बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित 132 व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कलाकार पद्मश्री मनोज जोशी, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह सोसायटीचे सदस्य, कलाकार उपस्थित होते.
मोबाईलच्या अतीवापरामुळे आज विद्यार्थी, शिक्षक, पालक तणावामध्ये असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये हिंसा पहायला मिळत आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे कला शिक्षण आहे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता जागी होते. विद्यार्थ्यांमध्ये वेगळा विचार करण्याची, प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवण्याची, नवीन विषय शिकण्याची क्षमता जागृत होते. कलेमुळे विद्यार्थ्याच्या मानसिक विकासात सकारात्मक प्रभाव पडतो. व्यक्तीला तणावमुक्त होण्यासाठी कला मदत करते. कला शिक्षण हा शालेय शिक्षणातील महत्वाचा घटक आहे. कला म्हणजे चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य आणि रंगभूमी या सर्वांचा त्यात समावेश होतो. आजच्या काळात कला शिक्षणाला कमी महत्व दिले जात आहे.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले, देशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगळी कला आहे. त्याची जोपासना करण्यात यावी. प्रत्येकाच्या घरात किमान एक कलाकृती असावी यासाठी बॉम्बे आर्ट सोसायटी सारख्या संस्थांनीही प्रयत्न करावेत. सर्वसामान्य लोकांमध्ये कलाकृतींचे महत्व सांगणे ही आजची गरज आहे. तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचेही आयोजन करावे. आज डॉ. उत्तम पाचारणे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. याचा मला आनंद आहे. यासह अनेक कलाकारांचाही आज सन्मान केला जात आहे. पुरस्कार प्राप्त कलाकारांचे मी अभिनंदन करतो.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रस्तावनेमध्ये संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर पद्मश्री मनोज जोशी कलेचे महत्व सांगताना म्हणाले, कितीही कृत्रीम बुद्धीमता आली तरीही व्यक्तीमधील स्पंदन आणि कल्पनाशक्ती यावर ती मात करू शकत नाही.
यावेळी डॉ. उत्तम पाचारणे यांना जाहीर करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला. उत्कृष्ट चित्रकार, शिल्पकार यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज”