Assembly campaign in Uttar Pradesh and Punjab will cool down today
उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा प्रचार आज थंडावणार
उत्तर प्रदेश /पंजाब : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 59 जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होत असून, त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. दरम्यान, काल समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी मैनपुरी आणि इटावा जिल्ह्यात आपला मुलगा आणि पक्षप्रमुख अखिलेश यादव यांचा प्रचार केला.
राज्यातील निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथमच मुलायमसिंग यादव सार्वजनिक व्यासपीठावर आले. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या उमेदवारांचा शिकोहाबाद मैनपुरी आणि लखीमपूर-खेरीमध्ये प्रचार केला.
आज पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते प्रचार करणार आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आज वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांसाठीच्या प्रचार फेऱ्यांमध्ये दूरदृश्य पद्धतीनं शपथ देणार आहेत. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि ए आय एम आय एमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी जालौन जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंजाब मध्ये येत्या रविवारी २० तारखेला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. प्रचाराचा कालावधी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असून त्यानंतर मात्र स्टार प्रचारकांनी मतदारसंघ क्षेत्रातून बाहेर जावं असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकरता पंजाब पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान, हॉटेल्स, लॉज आणि इतर ठिकाणी पाहणी करून मतदानाशी संबंध नसलेल्या, इतर राज्यातून आलेल्याना राज्याबाहेर जाण्याची सूचना करतील. मात्र उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना घरोघरी जाऊन प्रचार करायला मुभा दिली आहे.