Atal Innovation Mission, NITI Aayog & UNDP India launch Community Innovator Fellowship
अटल इनोव्हेशन अभियान, नीती आयोग आणि यूएनडीपी इंडिया यांनी समुदाय नवोन्मेषक फेलोशिपची केली सुरुवात
नवी दिल्ली : अटल इनोव्हेशन अभियान, नीती आयोग आणि यूएनडीपी इंडिया अर्थात संयुक्त राष्ट्रांचा भारतासाठीचा विकास कार्यक्रम यांनी आज संयुक्तपणे “आंतरराष्ट्रीय विज्ञान क्षेत्रातील महिला आणि बालिका दिना”निमित्त समुदाय नवोन्मेषक फेलोशिपची सुरुवात केली.
समाजातील समस्या सोडविण्यासाठी शाश्वत विकास ध्येयांवर आधारित उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सामाजिक संस्था स्थापन करण्यासाठी देशातील युवकांना संधी उपलब्ध करून देणारे प्री-इनक्युबेशन मॉडेल म्हणून या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली आहे.
या फेलोशिपच्या कालावधीत, प्रत्येक विद्यार्थ्याला अटल इनोव्हेशन अभियानाच्या एका अटल कम्युनिटी इनोव्हेशन केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल आणि तेथे त्यांना त्यांच्या संकल्पनेवर काम करत असतानाच शाश्वत विकास ध्येयांविषयी जागृती, उद्योजकताविषयक कौशल्ये आणि जीवनविषयक कौशल्ये यांच्याविषयीचे ज्ञान दिले जाईल.
सीआयएफ अर्थात समुदाय नवोन्मेषक फेलोशिपचा हा कार्यक्रम समाजातील नवोन्मेषी संशोधकांना त्यांच्या उद्योजकता विषयक प्रवासात आवश्यक असलेले ज्ञान आणि क्षमता निर्मिती मिळवून देण्यावर केंद्रीत असणार आहे.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार म्हणाले, “ही फेलोशिप म्हणजे एक वर्ष कालावधीचा कार्यक्रम असून त्यात तरुण समुदाय नवोन्मेषक विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्योजकता विषयक प्रवासात आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि ज्ञानवर्धन पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
ही फेलोशिप सुरु करताना नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत म्हणाले, “समाजात बदल घडवून आणणाऱ्या युवकांना तसेच समुदाय नवोन्मेषक परीसंस्थेतील इतर भागधारकांना समग्र आणि समावेशक शोधांच्या कामात गुंतविण्यासाठी ही फेलोशिप म्हणजे एक अत्यंत कल्पक मार्ग आहे.”
यूएनडीपीचे भारतातील निवासी प्रतिनिधी शोको नोडा म्हणाले, “या फेलोशिपच्या उपक्रमातून, आम्ही तरुणांना शाश्वत उद्योग नमुने म्हणून स्थापित होणारे उद्योग उभारण्याबाबत त्यांच्या स्वतःच्या कल्पना शोधण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”
देशातील अविकसित भागांमध्ये स्टार्ट अप आणि अभिनव संशोधनविषयक परिसंस्था विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने अटल कम्युनिटी इनोव्हेशन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.