Savitribai Phule Pune University team left for Nashik for the ‘Avishkar’ competition
‘आविष्कार’ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ नाशिकला रवाना
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेसाठी नाशिकला रवाना झाला आहे. सदर स्पर्धा १२ ते १५ जानेवारी दरम्यान नाशकातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे होणार आहे. हा संघ प्रस्थान करण्यापूर्वी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर व प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठातील विविध विभागाचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विद्यापीठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून विद्यार्थी विद्यापीठाला भेट म्हणून विजेतेपद देतील, अशी भावना प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी व्यक्त केली. विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील ४८ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यांच्यासोबतच आय.क्यू.ए.सी. विभागाचे संचालक प्रा. (डॉ.) संजय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली संघ व्यवस्थापक प्रा.(डॉ.) मोहन वामन, प्रा.(डॉ.) प्रगती ठाकूर तसेच ओएसडी श्री राधाकृष्ण ठाणगे, प्रशासकीय अधिकारी श्री. दीपक नरके, श्री. सूर्यकांत व्हनगावडे, डॉ. ज्योती पाटोळे, श्री संदीप वाघुले हे संघासोबत आहेत. ही स्पर्धा सहा विभागात होत असून यूजी, पीजी आणि पीजीजी अश्या एकूण तीन गटांसाठी घेतली जाते.
विद्यापीठातर्फे यूजी आणि पीजीसाठी प्रत्येकी ३ तर पीजीजीसाठी २ गट सहभागी होणार आहे. दरम्यान या स्पर्धेआधी विद्यापीठाने विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा घेतली होती. ज्यात पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक आणि अहमदनगर जिल्हातील विविध महाविद्यालयातून जवळपास ३५०० प्रकल्प विद्यापीठाकडे आले होते. या प्रकल्पातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ४८ प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. याआधी या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ९ वेळा विजेतेपद मिळाले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “‘आविष्कार’ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ नाशिकला रवाना”