Cultivate the Ayurvedic way of life
आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन
गोंदिया : देशाच्या अमृत काळात २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी, तसेच देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजन समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते.
महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य विषयक सुविधांबाबत समाधान व्यक्त करून उपराष्ट्रपती म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. वेद हा देशाचा मोठा सांस्कृतिक वारसा असून त्यात मोलाचे आरोग्यविषयक मार्गदर्शन आहे. उत्तम आरोग्याची जपणूक करून आपण नव्या भारताच्या निर्मितीत योगदान देऊ शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
योगविद्येच्या माध्यमातून भारताने जगाला एक मोठी देणगी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग पोहोचला आहे असे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की, यापूर्वी साधारण आजारांवरील उपचारांसाठीही परदेशात जावे लागत होते आता देशात सर्वत्र प्रगत उपचार उपलब्ध झाले आहेत. महाराष्ट्राने जिल्हास्तरावर सुपरस्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी मदत होईल. औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचा विशेष उल्लेख करून प्राचीन काळापासून सुरू असलेली आयुर्वेद जीवनपद्धती जपण्याचे आवाहन, उपराष्ट्रपतींनी केले.
आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त – मुख्यमंत्री
गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी, ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती. नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शासकीय रुग्णालयात सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीम म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या उत्तम सेवा देण्यासाठी गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता होतीच, जिल्ह्यातील नागरिकांची मागणीही होती. ही मागणी आज पूर्ण होत आहे. 690 कोटींच्या निधीतून या महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधेंसह 400 बेडची क्षमता राहणार आहे. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 150 विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी गोंदिया येथील विद्यार्थ्याना नागपूर येथे व दूरवर जावे लागत होते. परंतु आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून ही पायपीट दूर झाली असून आर्थिक व वेळेची बचतही झाली आहे. या भूमिपूजन समारंभास नागरिक, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी थोडक्यात…
गोंदिया, कुडवा येथे ६८९ कोटी रुपये खर्च करून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गोंदिया जिल्ह्याला सन २०१३-१४ मध्ये “विद्यमान जिल्हा/संदर्भ रुग्णालयांसह नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची परवानगी मिळाली. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची परवानगी मिळाल्यानंतर कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णालय (केटीएस जनरल हॉस्पिटल) आणि बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय (बीजीडब्ल्यु जनरल हॉस्पिटल) गोंदिया येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून १०० एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचे प्रवेश सुरू केले. केंद्र सरकारने २०१९ मध्ये ५० जागा वाढवून दिल्या.
दरवर्षी सुमारे दोन लाख रूग्णांची ओपीडी आणि २८ हजाराहून अधिक रुग्णांना दाखल केले जाते. दरवर्षी या हॉस्पिटलमध्ये १६ हजार शस्त्रक्रिया आणि जवळपास ५ हजार प्रसूती केल्या जातात.
कुडवा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदियाच्या नवीन आवारात अत्याधुनिक आयसीयू सुविधा, एमसीएच केअर सुविधा आणि ओटी कॉम्प्लेक्स असतील. यामुळे विविध बहु-विशेष विभागांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर, खाटांची क्षमता, वॉर्ड्सची पायाभूत सुविधा आणि जीएमसीच्या ओपीडी, ओटी, लेबर रूम, आयसीयूमुळे ३ लाख ते ४ लाख ओपीडींना आरोग्य सेवा पुरविण्यात मदत होणार आहे.
या ठिकाणी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. नवीन आवारात वैद्यकीय शिक्षणासाठी सुसज्ज लायब्ररी, प्रगत संवादात्मक अध्यापन कक्ष, परीक्षा कक्ष, क्रीडा सुविधा आणि सांस्कृतिक सभागृह उपलब्ध होणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा”