Calling for applications for Bal Shakti Award and Bal Kalyan Award has started
बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू
अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत
मुंबई : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेत स्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. तरी सदरचे अर्ज हे वर दिलेल्या संकेतस्थळावर विहीत वेळेत अपलोड करण्यात यावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच.नागरगोजे यांनी केले आहे.
बाल शक्ती पुरस्कार ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण,कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नावीण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
बाल कल्याण पुरस्कार हा वैयक्तिक व संस्थास्तरावर दिला जातो. वैयक्तिक पुरस्कारामध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्ष काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्थास्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो, संस्था पूर्णतः निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
पुरस्कारासाठीचे अर्ज www.awards.gov.in संकेत स्थळावर विहीत वेळेत अपलोड करण्यात यावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू”