Colleges should organize special camps for voter registration of students
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे
-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत अधिकाधिक विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्राद्वारे केले आहे.
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून विभागीय आयुक्त तथा पुणे विभागाचे मतदार यादी निरीक्षक यांनी पुणे जिल्ह्यात पाहणी दौऱ्यादरम्यान मतदार नोंदणीबाबत विविध सूचना केल्या. मतदान प्रक्रियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी असल्याने युवा लोकसंख्येच्या मतदार नोंदणीसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी शिबिरे आयोजित करावीत, विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, शिबिराच्या तारखेची माहिती महाविद्यालयातील सूचना फलकावर लावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. महाविद्यालयात ऑनलाइन ऑफलाइन मतदार नोंदणीच्या सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनाही अशी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के मतदार नोंदणी करण्यावर भर देण्यात यावा. शिबिर आयोजित करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर प्रसिद्धी द्यावी तसेच सबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी देखील शिबिराकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून कामकाजाची पहाणी करावी. वर्शिप अर्थ फाऊडेशन यांचा महाविद्यालयांशी युवा मतदार जागृती आदींच्या अनुषंगाने सामंजस्य करार झालेला असून त्यांच्याशी समन्वय साधावा, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
दूरदृष्य प्रणालीद्वारे मतदार नोंदणी शिबिराबाबत आढावा
उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वयक अर्चना तांबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत मतदार नोंदणीबाबत १५० महाविद्यालयांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
मतदार यादीमध्ये युवकांच्या कमी टक्केवारीचा विचार करता महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के मतदार नोंदणी करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मोहिम स्तरावर कार्यवाही करुन सहकार्य करावे. ग्रामीण भागातील महाविद्यालयात शंभर टक्के मतदार नोंदणी होईल याकडे लक्ष द्यावे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मतदार नोंदणी अर्ज भरण्यासाठी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने आपल्या सूचना किंवा कल्पना असल्यास कळवाव्यात. मतदार नोंदणी प्रक्रियेत अडचण आल्यास जवळच्या मतदान नोंदणी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती तांबे यांनी यावेळी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे”