Special Cataract Surgery Campaign extended till March 9
विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला ९ मार्चपर्यंत मुदतवाढ
नागरिकांनी लाभ घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
या मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष
मुंबई : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला 9 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
जास्तीत जास्त रुग्णांना या मोहिमेचा लाभ घेता यावा, यासाठी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी या मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मोहिमेसाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. याविषयी किंवा इतर आरोग्य विषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पंधरवड्यात 1 लाख शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष विभागाने ठेवले आहे.
या मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून, 2022 पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे नागरिकांना नि:शुल्क शस्त्रक्रिया करून आपली दृष्टी कायम ठेवता येणार आहे. राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान अंतर्गत 2022 ते 2025 या तीन वर्षात 27 लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे.
सन 2022-23 मध्ये राज्यात मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे 112.51 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबर, 2023 पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 67.30 टक्के मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता दि. 19 फेब्रुवारी ते दि.04 मार्च 2024 या कालावधीत जिल्हा स्तरावर ‘विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत असून मोहिमेकरिता 9 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे निर्देश