Central India Agricultural Exhibition – Agrovision from 24th November to 27th November at Nagpur
मध्य भारतातील कृषी प्रदर्शन- ॲग्रोव्हिजन 24 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात
ॲग्रोव्हिजन प्रसंगी दाभा येथे 300 कोटी रुपयाच्या तरतुदीने अॅग्रो कन्वेशनचे भूमीपूजनही करण्यात येणार – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नागपूर : विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्वाचे माध्यम ठरत असलेले मध्य भारतातील कृषी प्रदर्शन, ॲग्रोव्हिजन येत्या 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान पश्चिम नागपूरच्या दाभा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेच्या उद्घाटनाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय दुग्धउत्पादन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दुग्धउत्पादन मंत्री राधा कृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. या अॅग्रोव्हिजन प्रसंगी दाभा येथे 300 कोटी रुपयाच्या तरतुदीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे एग्रो कन्व्हेन्शन सेंटरचे भूमीपूजनही करण्यात येणार असल्याची घोषणा गडकरींनी केली.
कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे केंद्रस्थान ठरणाऱ्या कार्यशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषी विषयक ताज्या विषयांवरील कार्यशाळा, विदर्भाच्या शेती उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या परिषदांसोबतच टेक्नॉलॉजी इनोव्हेशनसाठी तसेच एमएसएमई व पशुधन ही विशेष दालने या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये राहणार आहेत,अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
विदर्भातून निर्यात होणाऱ्या कापसाच्या वाहतूक खर्चामध्ये कपात होण्यासाठी वर्ध्याच्या सिंदी पोर्ट इथून विदर्भात उत्पादित कापूस हा हल्दिया रेल्वे मार्गे पाठवून बांग्लादेशला नंतर जलवाहतुकीद्वारे या कापसाची वाहतूक केल्यास वाहतूक खर्चात कपात होईल आणि याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्याला होईल, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे विदर्भातील गोड्या पाण्यात होणाऱ्या मत्स्यव्यवसायामध्ये जर झिंग्याची निर्यात अन्य देशात केल्यास त्याचा फायदा विदर्भातील मालगुजारी तलावाच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना होईल. दुग्ध उत्पादकाला वरदान ठरणाऱ्या मदर डेअरीचा 450 कोटी रुपयांचा प्रकल्प सुद्धा नागपूरच्या बुटीबोरीत साकार होईल अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
यंदा ॲग्रोव्हिजनमध्ये एकूण ३ परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. गोड्यापाण्यातील मत्स्यव्यवसाय संधी, अन्न प्रक्रिया: मध्यभारतातील संधी आणि आव्हाने या विषयांवर परिषदा होणार आहे. . भारतातील शेतीविषयक उत्पादने तयार करणाऱ्या अनेक मोठया कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय विभाग, विविध राज्ये व कृषी विद्यापीठे प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान सादर करणार आहेत. कृषी व बिगरकृषी विद्यापीठातील विद्यार्थी, शेतकरी संशोधक, नवउद्योजक व्यक्तींना आपले शेती वा उत्कृष्ट इनोव्हेशन मांडणाऱ्यांना ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ओपन स्टॉल देण्यात येईल. दरवर्षी प्रमाणे यंदाही विदर्भातील शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा ॲग्रोव्हिजन अवार्ड देवून सन्मान करण्यात येणार आहे.
हळद आणि आले लागवड व प्रक्रिया, संत्रा आणि केळीचे निर्यातक्षम उत्पादन, उस लागवड तंत्रज्ञान, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, बे- हंगामी आणि निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन, भाजीपाला बियाणे उत्पादन, कापसाचे जास्तीतजास्त उत्पादनाचे नवे तंत्रज्ञान, रंगीत कापूस, सर्जीकल कापूस, जवस आणि करडई चे उत्पादन व मुल्यवर्धन, तेलबिया उत्पादन, कृषी वित्त, हरीतगृह तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्स, व्हर्टीकल फार्मींग, जलसमृद्धीतून ग्रामसमृद्धी – आकांक्षित वाशीम जिल्हा पॅटर्न, सुक्ष्म सिंचन, जलयुक्त शिवार, गट शेती, सेंद्रिय शेती, शेतीमध्ये यांत्रिकीकरण, कृषी रसायनांचा योग्य वापर, कृषी पर्यटनतसेच शेतीमध्ये कृत्रीम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान, हवामान अंदाजाचे महत्व असे अनेक विषयांवर या कार्यशाळेतून मार्गदर्शन केले जाईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मध्य भारतातील कृषी प्रदर्शन- ॲग्रोव्हिजन 24 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात”