CGST Commissionerate, Belapur arrests proprietor for GST fraud to the tune of Rs 26 crores
सीजीएसटी, बेलापूर आयुक्तालयाने 26 कोटी रूपये जीएसटी फसवणूक करणा-या मालकाला केली अटक
मुंबई : सीजीएसटीच्या मुंबई विभागाअंतर्गत येणा-या बेलापूर आयुक्तालयाने बनावट आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) नेटवर्क शोधून नवी मुंबईच्या मेसर्स अमरनाथ एंटरप्रायजेसच्या मालकाला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये 132.7 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या जारी करून 26.28 कोटींचे बनावट आयटीसी इतरांना पुरवल्याचे आढळून आले आहे.
सीजीएसटीच्या मुंबई विभागाच्या केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे तपास करण्यात आला.
यामध्ये संबंधित एंटरप्रायजेसकडून फक्त पावत्या जारी करण्यात आल्या होत्या, प्रत्यक्षात माल पुरवण्यात आला नाही, असे दिसून आले. तपासादरम्यान जमा करण्यात आलेले पुरावे आणि मालकाने दिलेली कबुली यावरून स्पष्ट झाले की, वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 132 मध्ये नमूद करण्यात आलेल्या कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून सरकारची फसवणूक करण्याचा गुन्हा केला आहे.
या प्रकरणात दि. 24 .02.2022 रोजी सीजीएसटी कायदा-कलम 69 अन्वये कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
सीजीएसटी, मुंबई विभागाने फसवणूक आणि करचोरी करणा-यांविरूद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून या प्रकरणी कारवाई करण्यात आली. कायद्याचे पालन करणा-यांच्या दृष्टीने अशा प्रकारे फसवणूक करणे आणि सरकारी करचुकवणे म्हणजे व्यवसायामधील चांगले स्पर्धात्मक आणि व्यावसायिक वातावरण खराब करणे आहे.
बेलापूर आयुक्तालयाने 2021-22 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 1138.59 कोटींची करचुकवेगिरी पकडली असून चौघांना अटक केली आहे. सीजीएसटी विभागाने आयटीसी नेटवर्क आणि इतर प्रकारे होणारी करचुकवेगिरी पकडण्यासाठी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरली. विभागाच्यावतीने पुढील काही दिवसांमध्ये आणि महिन्यांमध्ये फसवणूक करणा-या आणि करचोरी करणा-यांच्या विरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.